मंत्रालयाच्या शेजारील आकाशवाणी आमदार निवासला पहाटे आग

•शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या रूममध्ये आग लागली आहे. कोणतेही जीवित हानी नाही ; या घटनेनंतर शिंदे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
मुंबई :- मुंबईतील मंत्रालय शेजारील असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाला पहाटेच्या दरम्यान आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांच्या रूमला ही आग लागल्याची घटना समोर आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या घटनेनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे तसेच सरकारकडून कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा आमदारांनी केली आहे.
आकाशवाणी आमदार निवासामधील खोली क्रमांक 313 मध्ये ही आग लागली आहे. ही खोली आमदार संतोष बांगर यांची आहे. खोलीमध्ये असलेल्या एसी मध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. दुर्घटना ही कधीही होऊ शकते, ती काही सांगून होत नाही. अशा वेळी आमदार निवासस्थान असलेल्या इमारतीमध्ये अग्निशामक यंत्रणा लावलेली असूनही त्याची एक्सपायरी डेट गेलेली आढळून आली. इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही. यावर अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करायला हवी, असे देखील आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. सर्वच आमदार निवासाची अशीच अवस्था झालेली आहे. आम्ही अधिकाऱ्यांना अनेक वेळा ते दाखवून दिलेले आहे. त्यामुळे या संदर्भात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.