Karjat News : कर्जतमध्ये ‘हलाल लाईफस्टाईल टाउनशिप’मुळे वाद; धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा मानवाधिकार आयोगात आरोप
•राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतला दखल, राज्य सरकारकडे मागवला अहवाल
कर्जत :- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात धार्मिक आधारावर ‘टाउनशिप’ उभारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘हलाल लाईफस्टाईल टाउनशिप’ या नावाने उभारल्या जाणाऱ्या या टाउनशिपमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत एका तक्रारदाराने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे यासंदर्भात अहवाल मागवला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही टाउनशिप उभारली जात आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ही टाउनशिप धार्मिक आधारावर मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. एका विशिष्ट धर्मावर आधारित अशी स्वतंत्र टाउनशिप उभारून समाजात विभाजन आणि भेदभाव निर्माण केला जात आहे.
या टाउनशिपला यापूर्वीही सुरक्षा आणि सामाजिक हिताला धोका असल्याच्या कारणावरून विरोध झाला होता, तरीही बांधकाम सुरू आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप केल्यामुळे या टाउनशिपच्या बांधकामावर कशी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


