Panvel News : अत्याचार पिडीत समारिन नेवरेकरच्या कुटुंबीयांची सय्यद अकबर यांनी घेतली भेट
Panvel News : पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सय्यद अकबर यांची अल्पसंख्यांक आयोगाकडे आग्रही मागणी
पनवेल : तळेगाव दाभाडे येथील समरीन नेवरेकर आणि तिच्या दोन मुलांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अद्यापही मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे.या दुर्दैवी घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतर देखील एकही मृतदेह हाती न लागल्याने समरीन नेवरेकरच्या कुटुंबीयांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे.न्यायाच्या प्रतीक्षेत असणार्या कुटुंबीयांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या रहात्या घरी भेट घेऊन सांत्वन केले आणि प्रकरणातील दोषींना कठोर शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन समरीन नेवरेकरच्या कुटुंबीयांना दिले.
6 जुलै 2024 पासून तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असणारी समरीन निसार नेवरेकर ही 25 वर्षीय युवती,तिची मुले ईशांत नेवरेकर वय 5 वर्षे आणि इजान नेवरेकर वय 2 वर्षे यांच्यासह बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील गुलाम कादर मोहम्मद हनीफ यांनी केली होती. परंतु या प्रकरणांमध्ये पिडीत तरुणीला विवाहबाह्य संबंधातून गरोदर करणारा नराधम गजेंद्र दगडखैर आणि या अश्लाघ्य कृत्यामध्ये त्याला साथ देणारा रविकांत गायकवाड यांनी समरीन, इजात आणि ईशांत यांची हत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तूर्तास तळेगाव दाभाडे पोलिसांनी या दोन्ही नराधमांना अटक केली असल्याचे समजते.यासोबत अन्या तीन जण देखील अटकेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,परंतु जोपर्यंत मयत तरुणी व तिची मयत लहान मुले यांचे मृतदेह ताब्यात येत नाहीत तोपर्यंत या नराधमांना शासन करणे जवळपास अशक्य आहे. मुलीचे वडील आणि त्यांच्या आप्तेष्टांना असा संशय आहे की सदर प्रकरणात हेतूपुरस्सर पणे मृतदेह शोधण्याच्या कामात हलगर्जीपणा केला जात आहे.तसेच मुख्य आरोपी गजेंद्र याचा मोठा भाऊ दीपक दगडखैर, कविता नामक संशयित स्त्री यांची अटक होणे देखील गरजेचे आहे.या सार्या पार्श्वभूमीवर सय्यद अकबर यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जनाब प्यारे खान यांना या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालण्याचे निवेदन सादर केले आहे. तसेच मयत समरीन नेवरेकर चे वडील यांच्यासोबत बैठक देखील निश्चित केली आहे. मुंबई येथे अल्पसंख्यांक आयोगाचे विशेष कार्य अधिकारी जी एस सुरवसे यांच्याशी समक्ष भेटून सय्यद अकबर यांनी संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य विशद केले तसेच आपले निवेदन सादर केले.या नंतर सय्यद अकबर यांनी प्यारे खान यांच्यासोबत चर्चा केली प्यारे खान यांनी तातडीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले. प्यारे खान साहेब म्हणाले की समरीन नेवरेकर आणि तिच्या मुलांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषी असणार्यांची हयगय केली जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रत्यक्ष गुन्ह्याला साथ देणारे आणि अप्रत्यक्षरित्या या अमानवी गुन्ह्याला मदत करणार्या प्रत्येकाला कडक शासन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समरीन नेवरेकरच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अतीव दुःखाने भावना विवश झालेले सय्यद अकबर म्हणाले की झालेला घटनाक्रम ऐकताना डोक्यामध्ये अक्षरशः धाव पडत होते. दोन चिमूरड्या जीवांची कत्तल करताना ज्या शैतनांचे हात कापले नाहीत अशा नराधमांना कठोर शासन झालेच पाहिजे.मी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या समवेत पीडित कुटुंबाची भेट घालून देणार आहे.
प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे पोलीस तपासाचे काम झाले आहे त्यात संशयाला जागा आहे. सदरहू निवेदन देतेवेळी आणिप्रत्यक्ष चर्चा करतेवेळी सय्यद अकबर यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते बंदानवाज मनेर,हज कमिटी महाराष्ट्र सदस्य शकील काझी,समाजसेवक शफीक भट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.शकील काझी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समरीन नेवरेकरच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया दिली.तसेच त्यांच्या समवेत आदिल पटेल,माजी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा भाजपा व शाहिद खान,शिवसेना शिंदे गट अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे देखील उपस्थित होते.