देश-विदेश

Sydney Terror Attack : सिडनीतील बोन्डी बीच गोळीबार! – ज्यू समुदायाच्या हनुक्का उत्सवात 11 निष्पाप नागरिकांचा बळी; ऑस्ट्रेलियाने दहशतवादी हल्ला घोषित केला

•पिता-पुत्र दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; एकाच्या कारमध्ये आयईडी स्फोटक आढळले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीव्र निषेध व्यक्त

ANI :- ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराला हादरवून टाकणारी मोठी दहशतवादी घटना बोन्डी (Bondi) समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. ज्यू समुदायाच्या ‘हनुक्का’ उत्सवासाठी जमलेल्या शेकडो नागरिकांवर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रशासनाने या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे.

रविवारी संध्याकाळी बोन्डी बीचजवळच्या पार्कमध्ये ज्यू नागरिक उत्सवासाठी जमा झाले असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीद अक्रम आणि त्याचा 50 वर्षीय पिता साजिद अक्रम या दोघांनी पुलावर चढून जमावावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी सोबत 6 बंदुका आणल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात साजिद अक्रमचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरा दहशतवादी नवीद अक्रम याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. संशयिताच्या कारमध्ये ‘आयईडी’ (IED) स्फोटक उपकरणेही सापडली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून तीव्र निषेध

या भयावह हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त करत दहशतवादाविरोधात भारताचे धोरण स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, “ऑस्ट्रेलियाच्या बोन्डी बीचवर झालेल्या या भयावह दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हनुक्का साजरा करत असलेल्या ज्यू नागरिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो. या संकटसमयी आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत. भारत ऑस्ट्रेलियाबरोबर एकजुटीने उभा आहे. भारत जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो आणि दहशतवादाविरोधातील कारवाईला पूर्ण पाठिंबा देतो.”

सध्या अटक करण्यात आलेल्या जखमी नवीद अक्रमकडून हल्ल्यामागच्या कारणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0