Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | ‘आदित्य’ हट्ट की ‘पवार’ अनुभव? मविआमध्ये खलबतं सुरू
नवी दिल्ली | महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील सध्याचे बलाबल पाहता महायुती सहजपणे 6 जागा निवडून आणू शकते, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा येत आहे. याच एका जागेसाठी आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून, शरद पवार की शिवसेनेचा उमेदवार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुप्रिया सुळेंचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि दिल्लीत धाव
आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर शरद पवार आता मुंबईला जात आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा आणि नेत्यांचा आग्रह आहे की साहेबांनीच राज्यसभेवर जावे. यासाठी मी संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच दिल्लीत मी स्वतः काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटून शरद पवारांच्या नावावर एकमत करण्याची विनंती करणार आहे,” असे सुळे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असून, पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेचा दावा: आदित्य ठाकरेंची आग्रही भूमिका
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) या जागेवर आपला हक्क सांगत आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचे (20) सर्वाधिक आमदार असल्याने ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. रजनी पाटील (काँग्रेस), शरद पवार (राष्ट्रवादी) आणि प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना) या तिघांचीही मुदत संपत असल्याने, मविआचा एकच उमेदवार कोण असेल, यावरून तिन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे.
संख्याबळाचे गणित:
महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ: शिवसेना (20), काँग्रेस (16) आणि राष्ट्रवादी (10) असे एकूण 46 च्या आसपास आमदार.
विजयासाठी आवश्यक मते: एका जागेसाठी किमान 37 मतांची गरज आहे.
महायुतीचे वर्चस्व: महायुतीकडे 230 हून अधिक मते असल्याने ते 6 जागा सहज जिंकणार आहेत.
आजची बैठक ठरणार निर्णायक
राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते उपस्थित नव्हते, मात्र आजच्या बैठकीत शरद पवार यांच्या नावावर शिवसेना आणि काँग्रेस संमती देतात का, की आदित्य ठाकरेंच्या आग्रहाखातर शिवसेनेला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



