SSC Board Exam : आजपासून दहावीची परीक्षा…!!
•16 लाख 9 हजार 445 विद्यार्थी परीक्षेला बसणार, राज्यात 5 हजार 86 परीक्षा केंद्र
मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. परीक्षेसाठी 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधील 16 लाख नऊ हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.राज्यातील 5 हजार 86 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्य मंडळाने विविध उपाय योजना केल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी तब्बल 271 भरारी पथके तयार करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेच्या गोपनीयतेसाठी सहायक परीरक्षक बैठे पथक परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. SSC Board Exam
बोर्डाच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यामिक शाळांमार्फत परीक्षार्थीना देण्यात आल्या आहेत. सकाळी 11 च्या परीक्षेसाठी 10.30 आणि दुपारी 3 च्या परीक्षेसाठी 2.30 वाजता विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे. प्रश्नपत्रिकांचे वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे. तसेच परीक्षेस पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रचलित पध्द्तीप्रमाणे सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. SSC Board Exam
यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. SSC Board Exam