Uddhav Thackeray : ‘कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेचाच’ ठसविण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्यात

Uddhav Thackeray In Marathwada : ‘दगाबाज रे’ दौऱ्यातून सरकारवर टीका; ‘जाहीर केलेले पॅकेज थट्टाच’, थेट 50 हजार हेक्टरी मदतीची मागणी
पैठण :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी बुधवारी पैठण तालुक्यातील नांदर गावातून ‘दगाबाज रे’ संवाद दौऱ्याची सुरुवात केली. कर्जमाफीच्या मागणीचा आवाज उंचावत असतानाच, हा मुद्दा शिवसेनेचाच आहे हे शेतकऱ्यांमध्ये ठसविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आमदार बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. जूनपर्यंत कर्जमाफीचा विषय निकाली काढण्याचे संकेत दिले गेले असले तरी, हा मुद्दा शिवसेनेचाच आहे हे ठसविण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्याचा दौरा करत आहेत. अतिवृष्टीचे पॅकेज मान्य नाही, असे सरकारला सुनावत त्यांनी कर्जमाफीचा लढा आपण शेतकऱ्यांसाठी लढूच, असे सांगितले. अतिवृष्टीने बाधित पाच ते सात हजार लोकसंख्येच्या गावातून होणाऱ्या भाषणातून शेती प्रश्नावर यापुढे शिवसेना नेतृत्व करेल, असा संदेश ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर या गावातून ‘दगा बाज रे’ असे फलक लावून सरकारला अतिवृष्टीतील पॅकेज आणि कर्जमाफी यावरुन धारेवर धरायला सुरुवात केली. राजकारण करण्यासाठी आलो नाही, असे सांगत ठाकरे यांनी अतिवृष्टीच्या पॅकेजमधील मदत तुटपुंजी असल्याचे सांगितले. त्यांनी हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी योग्य आहे का, असा प्रश्न विचारत सरकारने मदत कशी कमी दिली, हे स्पष्ट केले. खरवडून गेलेली जमीन, बँकांचे हप्ते या मुद्दयांना स्पर्श करत त्यांनी बीड आणि धाराशिवमध्ये कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला.
अतिवृष्टीतील नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज ही थट्टाच असल्याचे सांगत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावला. कर्जमाफी केली तर बँकाचा फायदा होईल. बँकाचा फायदा न होऊ देता कशी कर्जमाफी करणार? कर्जमाफी जूनमध्ये होणार असेल तर बँकांचे हप्ते कसे भरणार आणि कोठून?” “कर्जमाफी हा विषय आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवू. त्यासाठी रस्त्यावर उतरू. या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करू तेव्हा तुम्ही साद द्या,” असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत शिवसेनेतील संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
‘मतचोरी’वरून भुमरेंच्या मतदारसंघात टोलेबाजी:
पैठण मतदारसंघात ‘मतचोरी’च्या मुद्दयाला बळ देत उद्धव ठाकरे यांनी आमदार विलास भुमरे यांच्यावर टोलेबाजी केली. “20 हजार लोक बाहेरुन आणून जिंकल्याचे निर्लज्जपणे सांगतात. आता निवडून आलाच आहात, आता तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी करा,” असे ठाकरे यांनी सुनावले. आमदार विलास भुमरे यांनी एका मेळाव्यात निवडणुकीमध्ये 20 हजार जणांना बाहेरून आणले असल्याचा उल्लेख केला होता, ज्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दटावल्याचे बोलले जात होते. ठाकरे यांनी याच ‘मतचोरी’ च्या मुद्दयाचा उल्लेख करून टीका केली.


