शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाणीचा व्हिडिओ ठाकरे गटाने पोस्ट
आमदार महेंद्र थोरवे यांनी हे आरोप फेटाळले
मुंबई :- शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला भरदिवसा बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत. मात्र, आमदार महेंद्र थोरवे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
नेरळ येथे एक व्यक्ती एका कारमधील व्यक्तीला जाडजूड रॉडने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. पीडित व्यक्ती वेदनांनी जोरात व्हिवळताना दिसून येतो. पण कुणीही त्याच्या मदतीला जात नाही. विशेष म्हणजे मारहाण करणारा बॅटिंग करण्याच्या स्टाइलमध्ये कार चालकाला मारहाण करत आहे. मारहाण करणारी व्यक्ती आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणी शिंदे गटावर टीकेची झोड उठवत राज्याच्या कायद्याच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप केला आहे. ठाकरे गटाने आपल्या X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही… कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल ! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये ! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय !
अंबादास दानवे यांची पोस्ट
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधत ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला आहे. मारहाण करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा अंगरक्षक आहे किंवा नाही मला त्यात रस नाही. पण एखाद्या व्यक्तीला भररस्त्यात अशी मारहाण करण्याची हिंमत होते ही फार गंभीर गोष्ट आहे. या घटनेवरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होते, असे अंधारे म्हणाल्या.
आमदार महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रकार 2 कार्यकर्त्यांमधील वादाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे गटाने मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. पण ते दोघेही आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी त्यांनी काही चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.