Shishir Shinde On Gajanan Kirtikar : शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करा, शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी
•शिंदे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या नेत्यांनीच शिंदे गटातील नेत्याची हकालपट्टीची केली मागणी
मुंबई :- शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.”गजानन कीर्तिकर यांनी माझा मुलगा ना नगरसेवक, ना आमदार ना डायरेक्ट खासदार होणार, असे वक्तव्य केले”,पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्रातून केली आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली. या मतदारसंघात मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे. या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी माझा मुलगा ना नगरसेवक, ना आमदार ना डायरेक्ट खासदार होणार, असे वक्तव्य केले. त्यानंतर शिंदे गटात अंतर्गत कलह पेटल्याची चर्चा आहे. या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
शिशिर शिंदे म्हणाले की
लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्ये केली. दोघांनीही विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिशिर शिंदे म्हणाले की, ‘कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी दिली. त्यानंतर अमोल हे गजानन कीर्तिकरांच्या कार्यालयातून कारभार करत होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेत असताना त्यांचा निधी अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे शिवेसेनेला शून्य लाभ झाला. त्याचा फायदा ठाकरे गटाला झाला, असे ते म्हणाले. मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती.