Sheena Bora Murder Case Update : शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट: सीबीआयने जबाब बनावट असल्याचा विधी मुखर्जीचा दावा

•कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन खोटे जबाब दाखल केल्याचा आरोप; इंद्राणी मुखर्जीला अडकवण्याचा कट
मुंबई :- तब्बल 13 वर्षांपूर्वी गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जी हिने सीबीआयवरच धक्कादायक आरोप केला आहे. सीबीआयने तिच्या नावाने न्यायालयात सादर केलेला जबाब बनावट आणि खोटा असल्याचा दावा तिने केला आहे.
विधी मुखर्जीचे नेमके आरोप काय?
विधी मुखर्जीने न्यायालयात सांगितले की, सीबीआयने शीना बोरा प्रकरणात माझा जबाब म्हणून जे काही सादर केले आहे, ते खोटे आहे. सीबीआयने कोऱ्या कागदांवर आणि ई-मेलच्या प्रतींवर माझ्या सह्या घेतल्या आणि नंतर त्या कागदपत्रांचा वापर जबाब म्हणून केला.
“जेव्हा माझी चौकशी केली जात होती, तेव्हा मी कधीही एकटी नव्हते. माझे सावत्र वडील पीटर मुखर्जी किंवा बहीण शंगोन दास गुप्ता यांच्यापैकी कुणीतरी सोबत होते,” असे विधीने कोर्टात सांगितले. खोटे जबाब आरोपपत्रात दाखल करून कोणालातरी जाणूनबुजून फसवण्याचा सीबीआयचा डाव असल्याचा आरोपही तिने केला.
याशिवाय, आई इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही विधीने केला आहे. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचे करोडो रुपयांचे दागिने आणि बँकेतील ७ कोटी रुपये चोरीला गेल्याचा खळबळजनक दावाही तिने केला.
शीना बोरा हत्या प्रकरण
शीना बोरा हत्या प्रकरण 2015 मध्ये उघडकीस आले होते, तेव्हा संपूर्ण देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या झाली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून या प्रकरणाचा उलगडा झाला.
इंद्राणी मुखर्जीने तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांच्या मदतीने आपली मुलगी शीना बोराची हत्या करून तिचा मृतदेह 25 एप्रिल 2012 रोजी विल्हेवाट लावला, असा आरोप आहे. सध्या इंद्राणी मुखर्जी जामीनावर बाहेर आहे.


