Sharad Pawar : “गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील!” पार्थ पवारांवरील गुन्ह्याबद्दल शरद पवारांची थेट प्रतिक्रिया

Sharad Pawar On Parth Pawar Land Scam : मुंढवा जमीन व्यवहार गंभीरच; मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून वास्तव मांडावे: शरद पवार
पुणे :- पुण्यातील मुंढवा परिसरात पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने केलेल्या 40 एकर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या गंभीर दोषारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार Sharad Pawar यांनी आज (शनिवारी) अकोल्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले. पार्थ पवार Parth Pawar यांच्यावर गुन्हा दाखल न होण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट सरकारला उत्तर देण्यास सांगितले.
‘गृहमंत्रीच देऊ शकतील उत्तर’
अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी आहे, तर त्यांचे व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील यांची केवळ 1 टक्के मालकी आहे. या प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले:
“महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही.”
मुख्यमंत्र्यांनी वास्तव मांडावे: या प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर म्हटले होते, याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले:
“मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करुन वास्तव हे त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. ते काम त्यांनी करावं, अशी अपेक्षा आहे.”
व्यवहार रद्द करण्यावर प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर दुय्यम निबंधकांनी मुंढव्यातील हा जमीन व्यवहार रद्द केला आहे. याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.”त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे त्यांनी निर्णय घेतला असेल.”
‘कोण तेजवानी?’ म्हणत काढला हात
यावेळी शरद पवार यांना शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी म्हटले की, “कोण तेजवानी, आणखी कोण, यांची नावं मला माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच हे सगळं शोधून काढावे.”



