Railway Mega Block : रविवारी, (8 जुन) मुंबई रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांना मोठी असुविधा होण्याची शक्यता

•पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर ट्रॅक आणि सिग्नलिंग कामासाठी मेगाब्लॉक लागू
मुंबई :- मुंबईतील रेल्वे सेवा वापरणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रविवारी (8 जून 2025) रोजी मोठी असुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येते. रेल्वे विभागाने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक लागू केल्याने अनेक लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.34 वाजल्यापासून दुपारी 3.35 पर्यंत स्लो लाईनवर मेगाब्लॉक राहील. यामुळे स्लो लाईनवरील ट्रेन फास्ट लाईनवर धावतील. काही लोकल ट्रेन सेवा रद्द केल्या जातील, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाऊ शकतात.
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे मार्गावर सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1.30 पर्यंत मेगाब्लॉक असल्याने काही मेल-एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन मार्गबदलित होण्याची शक्यता आहे. यात पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि वंदे भारत एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्या प्रभावित होतील.
हार्बर रेल्वेच्या वाशी ते पनवेल तसेच ठाणे ते वाशी मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर लाईनवरील सेवा प्रभावित होतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. वेळापत्रकातील बदलांकडे लक्ष देण्यास सांगितले असून, शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त करत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


