कोल्हापूर

Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज जोरदार शक्ती प्रदर्शन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधामध्ये शाहू महाराज यांची लढत होणार..

कोल्हापूर :- लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधामध्ये शाहू महाराज यांची लढत होणार आहे. या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला नाही. तर वंचितने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शाहू महाराज छत्रपती हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी या घराण्यातील संभाजी राजे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते राज्यसभेवर खासदार आहेत. वास्तविक या वेळी देखील संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, शाहू महाराजांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना पाठिंबा देत, आपण त्यांच्यासाठीच प्रचार करण्यात असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीच्या वतीने शाहू महाराजांना उमेदवारी देण्यास तिन्ही घटक पक्षांनी सकारात्मकता दाखवली होती. मात्र, शाहू महाराजांनी आपण काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याची इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यानुसार महाआघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला होता.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाची जागा होती. मात्र, शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे कोल्हापूर मतदारसंघ हा ठाकरे गटाला काँग्रेससाठी सोडावा लागला. मात्र, त्या बदल्यात ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षानेच लढावे, अशी स्थानिक काँग्रेस नेत्यांची मागणी होती. महाआघाडीच्या जागा वाटपात अखेर काँग्रेसला माघार घ्यावी लागली. त्यानुसार सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला. मात्र, असे असले तरी आता काँग्रेस पक्षातील स्थानिक नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0