
Amay Khopkar On The Kapil Sharma Show : अमेय खोपकर यांचा कपिल शर्माला कारवाईचा इशारा; ‘शहराच्या उल्लेखावरुन आमच्या भावना दुखावल्या’
मुंबई :- लोकप्रिय टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’ The Kapil Sharma Show मुंबईचा वारंवार ‘बॉम्बे’ असा उल्लेख करत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर Amay Khopkar यांनी थेट कपिल शर्मा आणि त्याच्या शोला हा प्रकार थांबवण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
‘बॉम्बेचे मुंबई नामकरण होऊन 30 वर्षे झाली, तरीही अनादर सुरूच
काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी हिने मुलाखतीदरम्यान मुंबईचा ‘बॉम्बे’ असा उल्लेख केला होता. या व्हिडिओ क्लिपमुळे खोपकर संतापले असून, त्यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडली आहे.
खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “बॉम्बेचे मुंबई असे अधिकृत नामकरण होऊन 30 वर्षे झाली. तरीही बॉलिवूडमधील कपिल शर्मा शोमध्ये सेलिब्रिटी, शोचे अँकर आणि हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास ‘बॉम्बे’ हा उल्लेख केला जातो.”
1995 मध्ये महाराष्ट्र शासनाने आणि 1996 मध्ये केंद्र शासनाने मुंबई या नावाला अधिकृत मान्यता दिली आहे. इतर शहरांची नावे योग्य पद्धतीने घेतली जातात, मग मुंबईचाच अनादर का, असा सवाल खोपकर यांनी विचारला आहे.
‘मुंबईचा अपमान सहन करणार नाही’
अमेय खोपकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, “आमच्या शहराचे नाव मुंबई आहे, बॉम्बे नाही. अशा प्रकारे मुंबईचा अपमान आम्ही सहन करणार नाही.” त्यांनी हा मुंबईच्या ओळखीचा ‘उघड अनादर’ असल्याचे म्हटले आहे. जर हा प्रकार थांबला नाही, तर मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसेची मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. त्यामुळे आता कपिल शर्मा शोचे निर्माते आणि कलाकार यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


