महाराष्ट्र

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदेंचा संतप्त इशारा! – “झाडं आमची आईबाप, त्यांच्यावर हल्ला केल्यास गप्प बसणार नाही!”

•कुंभमेळ्याच्या नावाखाली तपोवनातील झाडे तोडण्याला कडाडून विरोध; “साधू आले-गेले तरी फरक पडत नाही, पण झाडं वाचली पाहिजेत!”

नाशिक :- नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या निर्णयावर नाशिककरांनी तीव्र आंदोलन उभारले असतानाच, अभिनेते आणि ‘सह्याद्री देवराई’ संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारला थेट इशारा दिला आहे. झाडे ही ‘आईबाप’ असून, त्यांच्यावर हल्ला झाल्यास मुलं गप्प बसणार नाहीत, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.सयाजी शिंदे यांनी शनिवारी तपोवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडली.

‘झाडं वाचली तरच नाशिककरांचं भलं’

गिरीश महाजन यांनी रोपट्यांना हात लावणार असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये, अशी ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, “झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही मुलं इतकी बुळगी नाही की गप्प बसू.”

धार्मिक सोहळ्यापेक्षा पर्यावरणाला महत्त्व देत त्यांनी म्हटले, “साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये, ही सगळी झाडं वाचली पाहिजेत.”
‘हा शासन आपलं आहे की इंग्रजांचं?’
झाडांच्या व्याख्या आणि राष्ट्रीय वृक्षाबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी सरकारला लक्ष्य केले.

“आपल्याला झाडांच्या वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं महाराष्ट्र सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. वडाच्या झाडावर पाचशे-सहाशे प्रजाती जगतात. अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी थेट सवाल केला, “आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं? शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे?”

एक्झिबिशन सेंटरवरून सवाल

सयाजी शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली टेंडर काढल्याबद्दलही प्रश्नचिन्ह उभे केले. “तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे. त्यादृष्टीने पुढील 30-40 वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत. 14 नोव्हेंबरला ही ऑर्डर काढण्यात आली. मग या सगळ्यात कुठला साधूग्राम आणि कुठला कुंभमेळा आला?” असा सवाल त्यांनी केला.

यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि नाशिककरांची जनभावना काय आहे, हे बघितले पाहिजे. सर्व नाशिककरांनी एकत्र आले पाहिजे, “एकही काडी इथून उचलून देऊ नये,” असे आवाहनही सयाजी शिंदे यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0