Sathaye College : विलेपार्लेच्या साठे कॉलेजमध्ये थरार! इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

•कुटुंबीयांचा संशय – “कोणी तरी ढकललं असावं”; पोलिस तपास सुरू
मुंबई | विलेपार्लेतील प्रसिद्ध साठे कॉलेजमध्ये गुरुवारी (19 जून) एका 21 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी संध्या पाठक ही कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ बाबासाहेब गावडे चॅरिटेबल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दाखल होताच तिला मृत घोषित केलं.
संध्या ही मूळची नालासोपाऱ्यातील असून तिच्या मृत्यूमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी “कोणी तरी तिला ढकललं असावं” असा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून संध्याच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. तिच्या जवळून कोणताही सुसाइड नोट सापडलेला नाही. त्यामुळे ही आत्महत्या होती की अपघात की अजून काही, हे शोधण्यासाठी पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे.



