Sanjog Waghere : पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय

•प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला पक्षप्रवेश; पत्नी उषा वाघेरे प्रभाग 21 मधून भाजपच्या उमेदवार
पिंपरी-चिंचवड | राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि मावळ लोकसभा निवडणुकीत सहा लाखांहून अधिक मते घेणारे संजोग वाघेरे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. वाघेरे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपचे उपरणे गळ्यात घातले आहे.
“उद्धव ठाकरेंबद्दल आदर, पण विकासासाठी भाजपचा मार्ग”
पक्षप्रवेशापूर्वी भावना व्यक्त करताना संजोग वाघेरे म्हणाले, “आदरणीय उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दलचा आदर आजही माझ्या मनात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने शहराचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे जाईल.”
वाघेरे कुटुंबाकडे भाजपची मोठी जबाबदारी?
संजोग वाघेरे यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना कडवी झुंज दिली होती. आता भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवणार आहेत. या निर्णयामुळे भाजपमधील काही निष्ठावान इच्छुकांमध्ये नाराजी असण्याची शक्यता असली, तरी वरिष्ठ नेते ही नाराजी दूर करतील, असा विश्वास वाघेरेंनी व्यक्त केला आहे.



