Sanjay Shirsat : “ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत” — मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

•विट्स हॉटेल प्रकरणानंतर आयकर खात्याची कारवाई, शिरसाट यांची जाहीर कबुली
छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. विट्स हॉटेलच्या वादग्रस्त लिलाव प्रकरणानंतर आता त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली असून, खुद्द शिरसाट यांनीच याची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आर्थिक व्यवहारांची झाडाझडती होणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी सांगितले की, “आता काळा पैसा चालणार नाही. हे मी स्वतःलाही सांगतोय. 2019 आणि 2024 मधील संपत्तीतील फरकावर खुलासा मागण्यात आला आहे.” 9 जुलै रोजी आयकर खात्याकडे खुलासा सादर करावा लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रकरणाला मूळ आहे विट्स हॉटेलचा वाद. विरोधकांनी केलेल्या आरोपांनुसार, बाजारभावाने 110 कोटी रुपये असलेलं हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने फक्त 67 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप झाला होता. या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर करताना शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, पण विरोधकांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही लावून धरला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. आता आयकर विभागाची नोटीस ही त्या चौकशीच्या पुढची पायरी मानली जात आहे. सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधात अशा प्रकारची तपास यंत्रणांची सक्रीय कारवाई ही दुर्मीळ घटना मानली जात असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत ताणतणावही चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



