Maratha Protest Update : आंदोलन गुंडाळण्यासाठी पोलिसांची नोटीस, जरांगे घेणार कायदेशीर लढाई

•’तुम्ही मागणी फेटाळली, आता मैदान रिकामं करा’: मुंबई पोलिसांचा आदेश; मनोज जरांगे पाटील यांचा ठाम निर्धार कायम
मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता प्रशासनाने थेट आव्हान दिले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. यावर मराठा आंदोलकांनी कायदेशीर लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे.
नेमका प्रकार काय?
आज (2 सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी स्वतः ही नोटीस घेऊन आझाद मैदानात पोहोचले. प्रथम ही नोटीस मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी व्यासपीठावर जाऊन झोपेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जागे करून ही नोटीस त्यांच्या हातात दिली.
या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, “आंदोलनादरम्यान तुम्ही दिलेल्या परवानगीतील अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले आहे. तुमच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे तुमचा आंदोलनाचा अर्ज नाकारण्यात येत असून, आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिकामा करावा.”
जरांगे यांचा निर्धार कायम
पोलिसांची नोटीस मिळण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी सकाळीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. “मी मेलो तरी मराठ्यांना ओबीसीतून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. “सरकार कोणत्याही थराला जाऊ दे, मी त्या थराला जायला तयार आहे. मला तुरुंगात टाकले तरी तिथेही उपोषण करेन. पण आझाद मैदान कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,” असे ते म्हणाले होते.
आंदोलक कोर्टात जाणार
पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर मराठा आंदोलनाचे प्रमुख प्रतिनिधी विरेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवली आहे आणि तातडीने आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे. मात्र, ‘तात्काळ’ म्हणजे कधीपर्यंत, हे स्पष्ट नाही,” असे त्यांनी म्हटले. “आम्ही पोलिसांच्या या नोटीसला कोर्टात आव्हान देणार आहोत,” अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे आता हा मुद्दा पोलीस आणि आंदोलकांदरम्यान थेट कायदेशीर लढाईकडे वळणार असल्याचे दिसत आहे.



