मुंबई

Sanjay Raut : मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही, उद्धव-राज ठाकरे एकत्र मोर्चासाठी सज्ज!

•संजय राऊतांचा दावा ,5 जुलैचा मोर्चा ठरणार ऐतिहासिक,फडणवीस-शिंदेंवर टीका

मुंबई | “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले, तरी मराठी माणसाची एकजूट तुटणार नाही,” असा ठाम दावा शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

या मोर्चात शरद पवार यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आदेश दिले असून, काँग्रेससह अनेक छोटे पक्षही यात सामील होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे मोर्चाला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचे ते म्हणाले.

“पूर्वी एकमेकांपासून दूर राहणारे नेते आता एकत्र गप्पा मारताना, चहा पिताना दिसत आहेत. याचाच अर्थ येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येतील, अशी आमची भूमिका आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच, “मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे,” असं ठासून सांगितलं.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोर्चाला बदनाम करण्याचा आरोप केला आहे. “फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे गैरसमज पसरवले जात आहेत,” असं ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोलताना राऊत म्हणाले, “हे धोरण केंद्र सरकारचं आहे. यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमणे म्हणजे निर्णय मान्य करणे नव्हे.” तसेच, “या धोरणाची अंमलबजावणी करणारा जी.आर. उद्धव ठाकरे नव्हे, तर फडणवीस सरकारने काढला होता,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0