
Sanjay Raut On Amit Shah : “बाळासाहेब असते, तर या नेतृत्वावर संतापले असते” – राऊतांचा संतप्त सवाल
मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर Sanjay Raut On Amit Shah चोख प्रतिउत्तर देत राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे. नांदेडमध्ये अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “बालासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांना पश्चाताप झाला असता की तडीपारांना, मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी वाचवलं.”
राऊत पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरलं आहे. पहलगाममध्ये मातांचं सिंदूर उधळलं गेलं, म्हणून ही कारवाई करावी लागली. याला जबाबदार अमित शहा आहेत. राजीनामा द्यावा अशीच जनतेची भावना आहे.”
याशिवाय, त्यांनी मोदी-शहा जोडीवरही घणाघात केला. “हे लोक व्यासपीठावर उभं राहून भाषणं झाडतात आणि चर्चा सुरू होण्याआधीच बाहेर पडतात. आम्ही संसदेत विशेष अधिवेशनाची मागणी केली, त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवून विषय टाळला,” असा थेट आरोप त्यांनी केला.
अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, “बालासाहेब ठाकरे असते, तर ऑपरेशन सिंदूरच्या यशावर मोदींना मिठी मारली असती.” यावर पलटवार करत राऊत म्हणाले, “बालासाहेब असते तर मोदींना मिठी नव्हे, लाथ मारली असती. शिवसेना कोणाच्या भाषणांवर नाही, तर कृत्यांवर विश्वास ठेवते.”



