Sandeep Joshi : “आता मला थांबायचंय!” भाजपचे दिग्गज नेते संदीप जोशींची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; सत्तेच्या शर्यतीला दिला पूर्णविराम

•पक्षांतर आणि संधीसाधूपणाला कंटाळून घेतला मोठा निर्णय; 55 व्या वर्षी मैदान सोडत ‘निष्ठावान’ कार्यकर्त्याची भावनिक एक्झिट
नागपूर | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र मानले जाणारे संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. येत्या 13 मे रोजी त्यांच्या आमदारकीची मुदत संपत असून, त्यानंतर आपण कोणत्याही पदावर राहणार नाही किंवा पक्षाने पद दिले तरी ते स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. सध्याच्या राजकारणात वाढलेला संधीसाधूपणा, सत्तेसाठी होणारी ओढाताण आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची होणारी घुसमट पाहून आपण हा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी एका भावुक पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
संदीप जोशी यांनी आपल्या पत्रात सद्यस्थितीतील राजकीय संस्कृतीवर मर्मभेदी भाष्य केले आहे. “सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर आणि मर्यादित जागांमुळे निर्माण झालेली तीव्र स्पर्धा पाहून, आता आपणच थांबून तरुण रक्ताला संधी देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेल्या जोशींनी चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि आमदार अशी पदे भूषवली आहेत. मात्र, आता 55 व्या वर्षी राजकारणाला पूर्णविराम देऊन केवळ समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रासाठी वेळ देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची माफीही मागितली आहे.
राजकारणातून निवृत्त होत असले तरी, संदीप जोशी यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू राहणार आहे. कोरोनाकाळातील ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीची ‘दीनदयाल थाळी’ आणि विविध क्रीडा संघटनांच्या माध्यमातून ते सक्रिय राहतील. सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजसेवेची वाट अधिक महत्त्वाची मानत, त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. निष्ठा आणि मूल्यांच्या राजकारणासाठी स्वतःहून बाजूला होण्याचा हा पायंडा अनेकांसाठी आश्चर्याचा, तर अनेकांसाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.



