
Sandeep Deshpande On Ashish Shelar : राज ठाकरेंच्या दाव्यावर भाजपनेच शिक्कामोर्तब केल्याचा मनसेचा दावा; ‘व्होट जिहाद’च्या टीकेवर संदीप देशपांडेंचा सडेतोड पलटवार
मुंबई :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निघालेल्या ‘सत्याचा मोर्चा’ नंतर मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहारांवरून मनसे आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मलबार हिल येथे भिवंडी, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि पालघर येथील मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला होता. यानंतर भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी पत्रकार परिषदेत भाजपची भूमिका मांडताच मनसे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देण्यास नकार देत, मनसेला ‘प्रचलित कायदेशीर पद्धतीचा विसर पडला’ असल्याचे म्हटले. त्यांनी राज ठाकरेंना ‘मुस्लिम दुबार मतदारांवर गप्प का आहात?’ असा थेट सवाल केला होता. शेलार म्हणाले की, हरकती आणि सूचना घेण्याची वेळ निवडणूक आयोगाने दिली होती, ‘तुम्ही तेव्हा झोपला होतात.’
शेलार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. एका ओळीच्या ट्वीटमध्ये मनसेने म्हटले की, “राज ठाकरेंच्या दाव्यावर भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मतदार यादीत घोळ.” मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शेलार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शेलार यांच्या ‘बुद्धीला गंज लागला’ असा टोला लगावला आणि ‘त्यांना चांगले मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे असू शकेल,’ असे म्हटले. देशपांडे यांनी थेट सवाल केला की, “दुबार मतदार आहेत हे आशिष शेलार मान्य करतात, मग जर तुम्हाला मान्य आहे मग आमच्या लढ्यात सामील व्हा… आशिष शेलार ‘सत्याचा मोर्चा’ला का नाही आले?”
शेलारांनी ‘मतदारांत पण जात दिसली’ असे म्हणत, “आमच्यासाठी दुबार मतदार कोणत्या जातीचा आहे यापेक्षा त्याची नोंदणी दुबार आहे हे आणि ते काढलं पाहिजे,” असे देशपांडे म्हणाले. लोढांच्या मतदारसंघात, त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची नावं दोन-दोन ठिकाणी आहेत, असे सांगत देशपांडे यांनी शेलार इतरांच्या राजीनाम्याची मागणी करत असतील तर लोढांचा राजीनामा पण घ्यावा, अशी मागणी केली. ‘व्होट जिहाद’च्या आरोपावर मनसेने दुबार मतदारांच्या यादीत हिंदू मतदारच असल्याचे सांगत शेलारांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.


