मुंबई
Trending

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या निवडणुकीवरून सामनातून यांनी भाजपावर गंभीर आरोप

मोदी की गॅरंटी काँग्रेस सोडा राज्यसभेत जा, सामना वृत्तपत्रातून भाजपवर टीका

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून भाजपवर पूर्ण निशाणा साधला गेला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप सामना वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात आला आहे. मोदी की गॅरंटी काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा असा टोला सामना वृत्तपत्रातून भाजपला लगावण्यात आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत 15 जागेसाठी क्रॉस वोटिंग झाल्याची किंवा घोडेबाजार झाल्याचा विश्वास आहे. मागील 10 वर्षात विरोधी पक्षातील तब्बल 740 आमदार खासदार हे दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गंभीर आरोप सामनवृत्तपत्रातून भाजपवर करण्यात आला आहे. Rajya Sabha Election 2024

सामनाचा अग्रलेख

मोदी गॅरंटी

काँग्रेस सोडा; राज्यसभेत जा!

राज्यसभेच्या १५ जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेनुसार क्रॉस व्होटिंग झालेच. हे क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजार भाजपकडून शंभर टक्के होणार ही खात्रीही खरी ठरली. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये घोडेबाजाराच्या जोरावर भाजपने त्यांचा जास्तीचा एकेक उमेदवार निवडून आणला. उत्तर प्रदेशात त्याचा धक्का समाजवादी पार्टीला बसला. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले, परंतु एकाचा पराभव झाला. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव हा जास्त धक्कादायक ठरला. राज्यात काँग्रेसची सत्ता आणि पुरेसे संख्याबळ असूनही सिंघवी भाजपच्या घोडेबाजारामुळे पराभूत झाले. समसमान मते पडल्यानंतर त्यांच्याच नावाची ‘ईश्वरी चिठ्ठी’ निघूनही नियमाचा फटका त्यांना बसला व भाजपचे हर्ष महाजन विजयी घोषित झाले. राज्यसभा निवडणुकीला क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजाराची परंपरा जुनीच आहे. मात्र देशात मोदी राजवट आल्यापासून या घोडेबाजाराला ‘सरकारी कोंदण’ मिळाले आहे. लोकशाही मूल्ये, नीतिमत्ता, निवडणुकीचे संकेत आणि भाजप यांची फारकतच झाली आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षांत सर्वच निवडणुकांमध्ये भाजपवाल्यांचे ‘घोडे’ जास्तच उधळत आहेत. दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रातही हे घडले होते. आता उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात तेच घडले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्याही निवडणुकीत घोडेबाजार मांडायचा आणि विरोधी पक्षांमध्ये सेंध मारून आपले उमेदवार निवडून आणायचे. पुन्हा याला ‘नव चाणक्यनीती’ म्हणत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणुकीतील घोडेबाजार हेच सध्या भाजपच्या तथाकथित विजयाचे सूत्र बनले आहे. एकीकडे ‘काँग्रेसमुक्त भारत’ची धडपड आणि दुसरीकडे विरोधी पक्ष संपविण्याची तडफड. त्यासाठी आधी विरोधी पक्षनेत्यांच्या मानेवर केंद्रीय तपास यंत्रणांची टांगती तलवार ठेवायची आणि नंतर त्या नेत्यांना भाजपच्या वॉशिंगमध्ये शुद्ध करून भाजपवासी करून घ्यायचे. कधी ‘खोके’ द्यायचे, तर कधी थेट भाजपच्या उमेदवारीचा ‘जॅकपॉट’ द्यायचा. आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे. आताच्या राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात हेच घडले. हिमाचलमध्ये काँग्रेसच्या अभिषेक सिंघवी यांना ‘धक्का’ देणारे हर्ष महाजन आज भाजपचे असले तरी काँग्रेसचेच जुने नेते आहेत. महाराष्ट्रातून भाजपने स्वतःच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविलेले अशोक चव्हाण हेदेखील काँग्रेसचेच माजी मुख्यमंत्री आहेत. आदल्या दिवशी त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे दरवाजे खुले केले गेले. देशातील ज्या-ज्या राज्यांत काँग्रेसची पाळेमुळे आहेत, त्या-त्या राज्यांतील काँग्रेसची मंडळी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून ‘स्वच्छ’ केली जात आहेत. ‘मागील दहा वर्षांत विरोधी पक्षांतील तब्बल ७४० आमदार, खासदारांनी केवळ धाक आणि दबावापोटी भाजपमध्ये प्रवेश केला,’ असा धक्कादायक दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे एक पदाधिकारी सुप्रियो भट्टाचार्य यांनी गेल्याच आठवड्यात केला. त्यातील सर्वाधिक आमदार, खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत. एकीकडे ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि दुसरीकडे ‘शून्य विरोधी पक्ष’ असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’ होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही. काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा, हा सध्या भाजपचा मूलमंत्र बनला आहे व हिच मोदींची गॅरंटी बनली आहे. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण आणि हिमाचल प्रदेशातील हर्ष महाजन हे काँग्रेसजन याच गॅरंटीचे लाभार्थी ठरले आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे! Rajya Sabha Election 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0