RTO Officer Scam : ‘हम RTO ऑफिसर हैं’! बनावट अधिकारी बनून फसवणूक करणाऱ्या दोघांना समतानगर पोलिसांकडून अटक!

•Mumbai RTO Officer Fake News : मुंबईतील युवकाला धमकावून ऑनलाइन 5200 रुपयांची फसवणूक; पालघरमधून आरोपी जेरबंद, इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता!
मुंबई (कांदिवली) :- आरटीओ (RTO) अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून लोकांना भीती दाखवून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतील समतानगर पोलिसांनी अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी पालघर येथून या दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.
नेमका काय घडला प्रकार?
18 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8.30 ते 9.30 च्या सुमारास, तक्रारदार कुमार सुभार (वय 20, मालाड) हे त्यांच्या मित्राला पोईसर मेट्रो स्टेशन, कांदिवली पूर्व येथे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.
त्यांनी, “हम आर.टी.ओ. ऑफिसर हैं, आपकी गाडी यहां क्यू रूकाई हैं आपकी गाडी स्कॅन करणी पडेगी नहीं तो आपकी गाडी आर.टी.ओ. ऑफिस में जमा करणी पडेगी” अशी बतावणी करत फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला भीती घातली. भीतीपोटी फिर्यादीकडून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने 5200 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपास आणि अटक
गुन्हा दाखल होताच समतानगर पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राउत, पोउपनि राहुल वाळुंजकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक व पारंपारिक तपास पद्धतीचा वापर करून पोलिसांनी या गुन्ह्यात सचिन सुभाष चव्हाण (वय 38, रा. नायगांव, पालघर) आणि अजित भगत सिंग (वय 38, रा. नायगांव, पालघर) या दोघांचा सहभाग निश्चित केला.
दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, फसवणूक केलेले 5200 रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी यापूर्वीही याच प्रकारचे आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
उत्कृष्ट कामगिरी
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.


