Rickshaw driver suicide : “भरपाई दे, नाहीतर रिक्षा मिळणार नाही!” — धमकी, मारहाण आणि शेवटी आत्महत्या

Rickshaw driver suicide : डोंबिवलीतील वृद्ध रिक्षा चालकाचा दुर्दैवी अंत, कारचालकाच्या गुन्हेगारी कृत्याने उडाली कुटुंबात शोककळा
डोंबिवली | “रिक्षेचा धक्का लागला म्हणून इतका टोकाचा अन्याय?” – डोंबिवलीत एका 70 वर्षीय रिक्षा चालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हा सवाल साऱ्या शहरात घुमतोय. रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना एका कारचालकाने केवळ किरकोळ धक्क्याच्या कारणावरून डांबून ठेवले, मारहाण केली, आणि दोन लाख रुपयांची भरपाई मागितली. मानसिक तणावाने ग्रासलेल्या शेळके यांनी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रकरण नेमकं काय घडलं?
मंगळवारी सायंकाळी मुंजाजी शेळके (70 वय) हे रिक्षा चालवत असताना डोंबिवलीच्या मोठागाव भागात त्यांची रिक्षा आकाश एकनाथ म्हात्रे यांच्या कारला किरकोळ धडकली. संतप्त झालेल्या आकाश म्हात्रे यांनी शेळके यांना रिक्षेसह स्वतःच्या घरी नेले. तिथे त्यांना डांबून ठेवत, मारहाण करत, कारच्या नुकसानीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली.
रात्री तीनच्या सुमारास शेवटी आकाशने त्यांना सोडले. घरी परतलेले मुंजाजी शेळके तणावात होते. त्यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. परंतु त्यानंतर घरातील छताला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.“हे प्रकरण थांबले असते, जर आकाश म्हात्रे याने माणुसकी दाखवली असती,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
शेळके कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आकाश म्हात्रे यांच्यावर डोंबिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास सुरू असून, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
घटनेनंतर शहरातील रिक्षा संघटनांचे नेते – दत्ता माळेकर, प्रमोद गुरव, किशोर सरखांदे, रवी जाधव आदींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. “हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण मेहनतकऱ्यांचा अपमान आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.


