मुंबई

Rohit Pawar : रोहित पवारांचा हल्लाबोल; अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांवर ‘फ्री पार्टी’चा आरोप, व्हिडिओ व्हायरल

•पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘ट्रेनिंग’ कसले? पवारांचे सरकारला थेट प्रश्न, बिलाचे पैसे कुणी दिले?

मुंबई :- एका सरकारी अधिकाऱ्याची खरडपट्टी काढल्यामुळे चर्चेत आलेले आमदार रोहित पवार आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अन्न व सुरक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे अधिकारी ‘ट्रेनिंग’च्या नावाखाली पार्टी करताना दिसत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘ताज लँड’मधील ‘पार्टी’

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अन्न व सुरक्षा विभागाचे काही अधिकारी मुंबईतील प्रसिद्ध ताज लँड हॉटेलमध्ये पार्टी करत आहेत. यात महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘हा व्हिडिओ कुण्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पार्टीचा नसून, तो MPSC मधून नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा आहे,’ असे त्यांनी म्हटले. नियमानुसार या अधिकाऱ्यांचे शासकीय प्रशिक्षण झालेले असताना, त्यांना ताज लँडसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणते नवीन प्रशिक्षण दिले गेले? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

‘मंत्रालय कारवाई करणार का?’

रोहित पवारांनी या पार्टीचे बिल कोणी भरले, असा थेट प्रश्न विचारला आहे. ‘हे प्रशिक्षण अन्न व सुरक्षा आयुक्तांनी आयोजित केले होते की कुण्या खासगी व्यक्तीने? FAD चे अधिकारी म्हणून हॉटेलला धमकावून फुकटात वेलकम पार्टीचा आनंद लुटला का?’ असेही त्यांनी विचारले आहे.

याच संदर्भात त्यांनी एका तहसीलदाराचे उदाहरण दिले. ‘एका गाण्यामुळे एका तहसीलदाराला निलंबित केले जाते, तर मग महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 नुसार या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का?’ असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. तसेच, या नियुक्त्यांमध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे अन्न व सुरक्षा विभागाचे मंत्री देणार का, असे विचारत रोहित पवारांनी सरकारवर दबाव वाढवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0