Raj Thackeray : हिंदी सक्तीला मराठीतून उत्तर! राज ठाकरे 6 जुलैला गिरगाववरून काढणार मोर्चा

Raj Thackeray On Hindi Language : “ही मराठी अस्मितेची लढाई, पक्षीय झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी येणं गरजेचं” – राज ठाकरे
मुंबई | हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray On Hindi Language यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून ‘मराठी अस्मिते’साठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या आंदोलनात कुठलाही पक्षीय झेंडा नसेल, पण एक मराठी आवाज बुलंद होणार आहे.
महायुती सरकारच्या त्रिसूत्री भाषा धोरणाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती अनिवार्य करण्यात आली होती. विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतर ही भाषा ऐच्छिक करण्यात आली असली, तरी राजकीय व सामाजिक पातळीवर विरोध कायम आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून, “मराठीपण गमावण्याचा हा कट आहे,” असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र राज यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हिंदीची सक्ती कुठल्याही रूपात मान्य नाही.” ते पुढे म्हणाले, “शाळांमध्ये शिक्षण हे मुलांच्या आणि पालकांच्या भाषेत असावे. हिंदीची सक्ती म्हणजे केंद्राचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न आहे.”
राज ठाकरे यांनी या मोर्चात सर्व मराठी माणसांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व तज्ज्ञांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही, हा मराठीचा आहे. इथे झेंडा नसेल, पण ‘मराठी’ अजेंडा सर्वात मोठा असेल,” असं ते ठामपणे म्हणाले.
यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनाही सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं असून, “हा लढा फक्त माझा नाही, महाराष्ट्राचा आहे. कोण येतो आणि कोण नाही हे मी बघणार,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटी येथून निघणारा हा मोर्चा केवळ भाषेचा नव्हे, तर राज्याच्या अस्मितेचा आवाज ठरणार आहे.



