Rahul Gandhi : मतदार यादीतील ‘घोळ’वरून दिल्लीत रणकंदन! राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारांना अटक

•”संविधान वाचवण्यासाठीची लढाई,” राहुल गांधींचे गंभीर आरोप; प्रियंका गांधी म्हणाल्या, “सरकार भित्री.”
ANI :- देशात सध्या मतदार यादीतील कथित ‘मत चोरी’च्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील त्रुटींवरून गंभीर आरोप केल्यानंतर, आज अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या मकर गेटपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाण्यापासून रोखले. यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती, तरीही खासदार पुढे जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. बॅरिकेड्स लावून खासदारांना रोखण्यात आले. काही खासदार बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. अखिलेश यादव बॅरिकेड्सवरून उडी मारताना दिसले, तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.


राहुल गांधींचे गंभीर आरोप
यावेळी राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर थेट हल्ला चढवला. “सत्य हे आहे की ते (सरकार) बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही, तर संविधान वाचवण्याची लढाई आहे,” असे ते म्हणाले. ‘एक व्यक्ती, एक मत’ हे तत्त्व जपण्यासाठी आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, “हे लोक घाबरलेले आहेत. सरकार भित्रे आहे.”
दरम्यान, आज सकाळी निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 खासदारांना भेटीसाठी बोलावले होते, मात्र ‘सगळे खासदार भेटणार किंवा कुणीच नाही,’ अशी भूमिका विरोधकांनी घेतली. आम्ही शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यासाठी वेळ मागितला होता, भेटीसाठी नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी याआधीच मतदार यादीतील कथित घोटाळ्यांवरून ‘मत चोरी’चा आरोप करत एक मोहीम सुरू केली आहे, तसेच त्यासाठी एक वेबसाइटही सुरू केली आहे. यामुळे मतदार यादीतील गोंधळावरून आता दिल्लीतील राजकारण अधिकच तापले आहे.


