पुणे

Pune Police : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आउट’; एका दिवसात तब्बल 43 गुंडांना बेड्या

•गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर, कुख्यात आंदेकर गँगला मोठा दणका ,कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

पुणे :- शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता वावर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ-1 अंतर्गत पोलिसांनी गेल्या 24 तासांत तब्बल 43 सराईत गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही कठोर कारवाई केली असून, यामुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिसांची ‘ॲक्शन मोड’

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या होत्या. विशेषतः नानापेठ परिसरात झालेल्या कोमकर-आंदेकर गँगच्या गोळीबारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर घटनेनंतर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कंबर कसली. परिमंडळ-1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही विशेष मोहीम राबवली. या पथकाने रात्रीतून शहराच्या विविध भागांमध्ये छापे टाकून 43 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनेकजण कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न (कलम 307), दारूबंदी कायदा आणि शस्त्रबंदी कायद्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे केवळ काही गुंडांना अटक झाली नसून, शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे. पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0