पुणे

Pune News : मुंबई-बंगळुरू महामार्गावर परदेशी महिला ताब्यात,पुणे DRI आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई

•7 कोटी 63 लाखांचा क्रिस्टल मेथ सलवारच्या कप्प्यात लपवून नेण्याचा प्रयत्न फसला

पुणे | अमली पदार्थ तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) पुणे विभाग आणि सीमा शुल्क विभागाच्या (Customs) पथकाने मोठी कारवाई करत एक परदेशी महिला ताब्यात घेतली. तिच्याकडून 3 किलो 815 ग्रॅम क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून जप्त मालाची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्ये 7 कोटी 63 लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई मुंबई-बंगळुरू महामार्गावर एका प्रवासी बसवर करण्यात आली.

सलवारमध्ये बनवले होते खास कप्पे

DRI विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, कस्टम विभागाच्या मदतीने संबंधित महिलेचा पाठलाग करण्यात आला. सदर महिला प्रवासी बसमधून प्रवास करत होती. प्राथमिक तपासणीत तिच्याकडे काहीही आढळून न आल्याने पथकाने बसच पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या सामान कप्प्यात ठेवलेली तिची एक बॅग संशयास्पद वाटली. या बॅगेत सहा सलवार ठेवण्यात आले होते. तपासणी दरम्यान लक्षात आलं की प्रत्येक सलवारमध्ये पुठ्ठा लावून खास कप्पे बनवण्यात आले होते, आणि त्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांमध्ये क्रिस्टल मेथ लपवण्यात आले होते.

NDPS कायद्यांतर्गत अटक, पुढील तपास सुरू

या प्रकरणात संबंधित परदेशी महिलेविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

या तस्करीमागे कोणाचा हात आहे, अमली पदार्थ कुठून आले आणि कुठे विकले जाणार होते यासंदर्भात सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती DRI विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0