Vikhroli MNS Rada : विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा! ‘व्हाट्सअप स्टेटस’ वरून परप्रांतीय तरुणाला मारहाण

•विक्रोळीतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा राग; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई, विक्रोळी | मुंबईतील विक्रोळी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी केलेली आणखी एक धमकावणारी कारवाई समोर आली आहे. येथे टॅगोर नगर मार्केटमधील ‘लकी मेडिकल शॉप’मध्ये काम करणाऱ्या प्रेमसिंह देवडावर, काही मनसे कार्यकर्त्यांनी कथितरीत्या मारहाण केली आणि जबरदस्तीने माफी मागायला लावली.
प्रेमसिंह देवडा हा मूळचा राजस्थानचा असून त्याने व्हॉट्सअॅप स्टेटसवर मराठी आणि महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या स्टेटसवर मनसेचे स्थानिक पदाधिकारी विश्वजीत ढोलम यांच्यासह इतर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी दुकानदाराला दुकानाबाहेर बोलावून घेत, त्याला सार्वजनिक ठिकाणी माफी मागण्यास भाग पाडले. इतकेच नाही, तर लोकांना त्या दुकानातून काहीही खरेदी करू नये, अशी हाकही देण्यात आली.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रेमसिंह देवडा हात जोडून आणि कान धरून माफी मागताना दिसत आहे. पोलिसांनी या तरुणाला पोलीस ठाण्यात नेले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मनसे कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. 12 जुलै रोजी विरार रेल्वे स्थानकावर एक रिक्षाचालक फक्त मराठी बोलण्यास नकार देतो, म्हणून मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हात साफ केला. त्यालाही माफी मागण्यास लावण्यात आले. रिक्षाचालकाचा “मी हिंदी बोलेन, तुम्ही काय कराल?” म्हणणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
यापूर्वीही मीरा रोड येथील ‘जोधपूर स्वीट्स’ दुकानाच्या मालकावर मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलल्यामुळे हल्ला केला होता. त्या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात निदर्शने केली होती. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.


