Pune Crime News : पुण्यात ‘कोयता गँग’ची दहशत! धनकवडीत 18 वाहनांची तोडफोड, दोन नागरिक जखमी

•मध्यरात्रीच्या थराराने धनकवडी हादरली; आठवडाभरात शहरात वाहन तोडफोडीची तिसरी घटना
पुणे :- पुणे शहरात ‘कोयता गँग’ आणि टोळक्यांची दहशत वाढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धनकवडी भागात मंगळवारी मध्यरात्री अज्ञाट टोळक्याने अक्षरशः हैदोस घालत 18 वाहनांची तोडफोड केली. इतकेच नाही, तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रहिवाशांवर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केले. आठवडाभरात पुणे शहरात वाहन तोडफोडीची ही तिसरी मोठी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथनगर भागात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने आरडाओरडा करत दहशत माजवली. त्यांच्या हातात कोयते आणि दांडकी होती. त्यांनी शिवीगाळ करत परिसरातील नागरिकांना धास्ती भरवली. या टोळक्याने रिक्षा, तीन मोटारी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या दोन व्हॅन आणि एका टेम्पोची निर्दयीपणे तोडफोड केली. वाहनांवर दगडफेकही करण्यात आली.
टोळक्याच्या या कृत्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन स्थानिक रहिवाशांना आरोपींनी मारहाण केली आणि त्यांना तीक्ष्ण शस्त्राने जखमी केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस पोहोचेपर्यंत टोळके घटनास्थळावरून पसार झाले होते. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धनकवडीतील घटनेपूर्वी, आठवडाभरात हडपसरमधील रामटेकडी, भवानी पेठ आणि कोंढवा भागातही तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात शिरून टोळक्याने हल्ला करत खाद्यपदार्थांची पाकिटे फेकली होती आणि दुकानासमोर लावलेल्या रिक्षाची काच फोडली होती. तसेच, औंधमधील विधाते वस्ती आणि सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेतही टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.
या वाढत्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली असून, मध्यरात्री उपनगरांतील वेगवेगळ्या भागांत गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत. तसेच, दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही रहिवाशांनी केली आहे. पुणे पोलिसांकडून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे.



