पुणे

Pune Bribe News : जमीन फेऱ्याच्या बदल्यात मंडल अधिकाऱ्याची ‘लाच डील’ उघड – एसीबीकडून रंगेहाथ पकड

•38 गुंठे जमिनीच्या नावनोंदणीसाठी 2 लाखांची मागणी,मध्यस्थालाही ऑनलाईन 10 हजारांची लाच; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, मावळ | जमिनीच्या फेरफार नोंदीवर मंजुरी देण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागणारा मंडल अधिकारी आणि त्याचप्रमाणे 10 हजार रुपये घेतलेला मध्यस्थ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मावळ तालुक्यातील कुसगाव येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात करण्यात आली.

या प्रकरणी शिवणे विभागाचे मंडल अधिकारी मारूती महादेव चोरमले (53 वय) आणि मध्यस्थ जयेश बाळासाहेब बारमुख (33 वय) यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या बहिणीसह 21 जणांनी 2018-19 मध्ये 1.90 कोटी रुपये देऊन कुसगावमधील 38 गुंठे जमीन एका बांधकाम व्यावसायिकाकडून विकत घेतली होती. मात्र, संबंधिताने फसवणूक करत ती जमीन तिसऱ्याच एका व्यक्तीकडे खरेदीखताद्वारे विकली होती. या पार्श्वभूमीवर नवीन मालकाने त्या जमिनीच्या फेरफाराची नोंद घेण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता, आणि नोंदीनंतर तो दस्तऐवज मंजुरीसाठी मंडल अधिकारी चोरमले यांच्याकडे गेला होता.

तक्रारदारांनी त्यावर हरकत घेतल्यानंतर चोरमले यांनी फेरफार रद्द करण्यासाठी व जमीन मूळ हक्कदारांच्या नावावर नोंदवण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. पुढील व्यवहारासाठी त्यांनी मध्यस्थ जयेश बारमुखकडे पाठवले, ज्याने चोरमले यांच्यासाठी 2 लाख आणि स्वतःसाठी 10 हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदाराने ही संपूर्ण बाब थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. खात्री झाल्यानंतर 15 जुलै रोजी सापळा रचण्यात आला, आणि त्यात चोरमले यांना 2 लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले, तर जयेश बारमुखने ऑनलाइन पद्धतीने 10 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0