Pune Crime News : देशी पिस्तुलांसह शेखर ठोंबरे जेरबंद – पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई

•तीन देशी पिस्तुलं व सहा काडतुसे जप्त; विक्रीपूर्वीच पोलिसांच्या सापळ्यात अडकला
पुणे | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह पकडला गेला. मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय 27, रा. संतोषनगर, कात्रज) असे आहे. पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे-पाटील यांना ठोंबरेकडे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ठोंबरेला अटक केली आणि त्याची झडती घेतली.
झडतीत त्याच्याकडे तीन देशी बनावटीची पिस्तुलं आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. तो या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी बाहेर पडला होता का, याचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.



