राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या तरुणाला अटक; ‘दोन समाजात तेढ’ निर्माण केल्याचा आरोप

- पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, अंधेरी परिसरात तणावपूर्ण शांतता
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर अपशब्दांचा वापर करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. व्हॉट्सॲपवर झालेल्या या प्रकारामुळे दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत जयप्रकाश दुबे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो अंधेरीतील कोडीविटा गाव येथील रहिवासी आहे. सुजीत दुबे याने दारूच्या नशेत राज ठाकरे यांच्याबद्दल शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहणाऱ्या एका नागरिकाने, अँथनी डिसोझा, यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत शनिवारी सायंकाळी दुबेविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम 196(1), 296, 351, 352, 356(2) अंतर्गत दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी सुजित दुबेला अटक केली.
या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले असून, भविष्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. याआधी मीरा रोड येथे मराठी-अमराठी वाद निर्माण झाला होता, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.


