Maharashtra Politics Update : गोपीचंद पडळकर-रोहित पवारांमध्ये ‘कार्यकर्त्यां’वरून जुंपली; राजकीय आरोपांची धुमश्चक्री

Maharashtra Political Latest Update : कार्यकर्त्याच्या मारहाणीवरून दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर गंभीर आरोप; जुन्या वादाला नवी फोडणी
मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार वाद पेटला आहे. पडळकर यांनी थेट आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर, पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पडळकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील जुना वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपात बदलल्याचे दिसत आहे.
कार्यकर्त्याला मारहाण आणि पडळकरांचे आरोप
पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अमित सुरवसे आणि त्याच्या ६ साथीदारांना अटक केली आहे. हांडे यांची भेट घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी थेट रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
रोहित पवारांचे पलटवार
पडळकर यांच्या आरोपांना उत्तर देताना रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, हांडे आणि सुरवसे हे जुने मित्र आहेत, मात्र त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत. यापूर्वी 30 जून रोजी अमित सुरवसे यांनाही मारहाण झाली होती आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ‘जर अमित सुरवसे यांनी केलेल्या कृत्यावर कारवाई होणार असेल, तर 30 जूनच्या घटनेतील शरणू हांडेवरही त्याच प्रकारची कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी व्हायरल झालेल्या एका फोटोवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, शरणू हांडे रुग्णालयात असताना त्यांच्या कानात भाजपचा कार्यकर्ता माऊली हवणार काहीतरी सांगत आहे. ‘त्यानंतर लगेच हांडेंनी माझे नाव घेतल्याने मला मुद्दामहून या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे का,’ असा सवाल रोहित पवार यांनी केला. यावरून आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.



