
Pune Weather Latest Weather Update : निवृत्तांचे शहर’ अशी ओळख असलेल्या पुण्यातील हवा गुणवत्ता धोक्यात; फक्त शेकोट्यांवर बंदी हाच उपाय आहे का?
पुणे :- पुण्यातील वाढत्या प्रदूषणाबद्दल पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी शहरात शेकोट्या पेटवण्यावर बंदी घालून एक स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. Pune Ban Bornfire मात्र, या निर्णयामुळे शहरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या ‘प्रदूषण’ विषयक धोरणांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असताना, त्यावर उपाय म्हणून केवळ शेकोट्यांवर बंदी घालणे पुरेसे आहे का, हा मुख्य प्रश्न आहे.
प्रदूषणाची वाढती जंत्री आणि प्रशासनाची भूमिका
इतर प्रदूषक: रस्त्यांवरील खड्डे, इमारतींच्या बांधकामातून हवेत पसरणारे धुळीचे कण आणि वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?
नदीची दुरवस्था: पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी, पण पावसाळा संपल्यावर केवळ ‘नदी’ असल्याची जाणीव करून देणारी मुठा नदीची दुरवस्था आणि तिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे मोठे चिंतेचे कारण आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्प: बंद पडलेल्या आणि अपूर्ण असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काय, जे शहराच्या प्रदूषणात मोठी भर घालत आहेत?
बंदीचे कारण आणि अंमलबजावणी
शहरातील हवा प्रदूषण वाढवण्यास गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले, निवासी परिसरांमधील सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवत असलेल्या शेकोट्या कारणीभूत ठरत आहेत. या शेकोट्यांमध्ये कोळसा, जैविक पदार्थ (बायोमास), प्लास्टिक, रबर आणि अन्य कचरा जाळण्यात येत असल्याने धूर होतो. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी शेकोटी पेटविण्यास बंदी घातली आहे.
यापुढे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई होणार आहे.
पुणेकरांना आवाहनाची वेळ
‘निवृत्तांचे शहर’ अशी ओळख असलेल्या पुण्यातील आल्हाददायक हवा आता धोक्यात आली आहे. शेकोट्यांवर बंदी हा केवळ तात्पुरता उपाय असू शकतो. त्यामुळे आता केवळ शेकोट्यांची नव्हे, तर प्रशासकीय उदासीनतेची मशाल पेटवून पुणेकरांनी प्रदूषणाविरोधात कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.



