Powai News : पवईच्या पॉश सोसायटीत कुत्र्याचा हैदोस! वारंवार हल्ले, अखेर मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा

•जर्मन शेफर्ड व केन कोर्सने केले पाळीव प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ले
मुंबई :- पवईमधील हाई-प्रोफाईल हिरानंदानी गार्डन सोसायटीत एका पाळीव श्वानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. श्वान मालक गणेश चुक्कल यांच्याकडील तीन जर्मन शेफर्ड आणि एक केन कोर्स या श्वानांनी आतापर्यंत तीनहून अधिक नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही मालकाने कुठलीही खबरदारी घेतली नाही, म्हणून पवई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 291 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
26 मे रोजी मुझील जेकब (39 वय) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार चुक्कल आपल्या श्वानांना कोणतीही सुरक्षितता न राखता — न तोंडाला मास्क, न दोरी — खुले सोडतात. 13 मार्चला या श्वानाने सोसायटीतील रहिवासी अदिती भाटियांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केले.
त्यानंतर 24 मार्च आणि 29 मार्च रोजी आणखी दोन घटना घडल्या. रहिवासी मायकेल शॉ व अनुज सूर यांच्या श्वानांवर हल्ले झाले, शिवाय अनुज यांनाही श्वानाने चावा घेतला. विशेष म्हणजे, त्या वेळी श्वानहँडलरकडून कोणतीही सुरक्षितता पाळली गेली नव्हती.
अखेर 17 मे रोजी खुद्द तक्रारदार मुझील जेकब यांच्यावरही श्वानाने हल्ला केला. वारंवार तक्रारी करूनही चुक्कल यांनी निष्काळजीपणा सुरूच ठेवला.
पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच चुक्कल यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. सोसायटीमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, नागरिकांनी सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



