ST Bus Ganeshotsav : गणेशोत्सवात एसटीचा ‘विक्रम’, 5.96 लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास

•एसटी महामंडळाला 23.77 कोटींचे उत्पन्न; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक
मुंबई :- यंदाच्या गणेशोत्सवात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून सुमारे 5 लाख 96 हजार कोकणवासीयांनी एसटी बसने सुखरूप प्रवास केला असून, यातून महामंडळाला तब्बल 23 कोटी 77 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी कौतुकास पात्र आहेत, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
5 हजार जादा बस, 15 हजार फेऱ्या
प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने यंदा 5 हजार जादा बसची सोय केली होती. या बसच्या 15 हजार 388 फेऱ्यांमधून विक्रमी संख्येने प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत चालवलेल्या या विशेष वाहतुकीचे योग्य नियोजन करून गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले, असे सरनाईक यांनी सांगितले. या सेवेसाठी राज्यभरातील विविध आगारांतून 10 हजाराहून अधिक चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक मुंबई, ठाणे व पालघर विभागात दाखल झाले होते. या सर्वांनी विविध अडचणींना तोंड देत ही प्रचंड वाहतूक यशस्वीपणे हाताळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
परतीच्या प्रवासातील भाडेवाढीचा निर्णय मागे
गणेशोत्सवादरम्यान महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात आली होती. तसेच नादुरुस्त बसगाड्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात 100 अतिरिक्त बस तयार ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, एसटीने परतीच्या प्रवासासाठी 30 टक्के जादा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु प्रवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून महामंडळाने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.



