सातारा

Rupali Chakankar : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : ‘आयसी कमिटीकडे तक्रार नव्हती, पोलीस-डॉक्टरांचीच वादावादी’ – रुपाली चाकणकर

•’लक्ष्मीपूजनाला प्रशांत बनकरच्या घरी झालेल्या वादानंतर आत्महत्येची धमकी’; बदनेच्या लोकेशनची चौकशी सुरू

सातारा :- फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर राज्यभर संताप व्यक्त होत असतानाच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या आहेत. या प्रकरणात आयसी कमिटीकडे डॉक्टर महिलेने कोणतीही तक्रार केली नव्हती, तर तिची तक्रार पोलीस आणि डॉक्टरांच्या परस्पर वादाशी संबंधित होती, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयात पोलीस आणि डॉक्टर यांच्यात परस्पर तक्रारी होत्या. ‘पेशंटला उशिरा तपासणे’ किंवा ‘फिट अनफिट’ करण्यावरून पोलिसांची तक्रार होती, तर ‘रात्रीच्यावेळी पेशंट आणून अनफिट केले जाते’ अशी डॉक्टर महिलेची तक्रार होती. या तक्रारी चौकशी समितीने निकाली काढल्या होत्या. दरम्यान, या डॉक्टर महिलेची तीनवेळा बदली करण्यात येत होती, पण तिला फलटणमध्येच नोकरी करायची होती.

लक्ष्मीपूजनाच्या रात्री घडला मोठा वाद

आत्महत्येपूर्वीच्या घडामोडींवर प्रकाश टाकताना चाकणकर म्हणाल्या की, सीडीआर रिपोर्टनुसार, मृत डॉक्टर महिलेचा पीएसआय गोपाल बदने याच्याशी जानेवारी ते मार्च या काळात संवाद होता, त्यानंतर त्यांचा संवाद झाला नाही. मात्र, प्रशांत बनकर सोबत तिचा संवाद होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेली होती. तिथे फोटो काढण्यावरून दोघांमध्ये मोठा वाद आणि भांडण झाले आणि त्यानंतर ती घरातून हॉटेलकडे निघून गेली.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिने रात्रभर प्रशांत बनकरला मेसेज केले, ज्यात ‘मी आत्महत्या करेल’ अशा धमक्यांचा समावेश होता. यावर प्रशांतने तिला ‘यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होतीस,’ असे प्रत्युत्तर दिले होते.

तपासाची दिशा आणि बदनेचा शोध

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, या प्रकरणात प्राथमिक अंदाज आत्महत्या असल्याचा असून, आज किंवा उद्या पीएम रिपोर्ट येईल. याशिवाय, गोपाल बदने आणि मृत डॉक्टर महिलेचे लोकेशन एकत्र आहे का, हे चेक केले जाईल आणि लोकेशन सापडल्यानंतर बदनेवर कारवाई केली जाईल. पोलीसही बदनेकडून अधिक माहिती घेत आहेत.

याप्रकरणी पीएम रिपोर्ट, सीडीआर आणि फॉरेन्सिक अहवाल तपासले जात आहेत. तसेच, डॉक्टर महिलेची जुलै महिन्यातील तक्रार पोलिसांनी मे महिन्यातील रेकॉर्डसह जनरल डायरीमध्ये नमूद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0