Panvel Crime News : 4.5 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात
•पनवेल तहसील कार्यालया बाहेर काम करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला एसीबीने अटक केली आहे. “साहेबांसाठी, पैसे द्यावे लागेल असे सांगून मागितली लाच
पनवेल :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी कारवाई करत एका खाजगी व्यक्तीला लाच स्वीकारताना पनवेल तहसील कार्यालयाच्या बाहेरून अटक केली आहे. वडिलांच्या नावाने असलेल्या रेशन कार्ड वरील उत्पन्न 80 हजार वरून 40 हजार करण्याकरिता खाजगी व्यक्ती असलेला आनंद श्यामराव गुरव (32 वर्ष) याला 4.5 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. साहेबांसाठी पैसे लागेल असे सांगून लाच मागितली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीवरून, पनवेल तहसील कार्यालयाच्या बाहेर एजंट म्हणून काम करणारा आनंद श्यामराव गुरव याला लाच प्रकरणी अटक केली आहे. तक्रारदार यांच्या रेशनकार्ड वरील पूर्वी असलेले उत्पन्न 80 हजार ते कमी करून 40 हजार करायचे होते. रेशनकार्ड वरील उत्पन्न कमी करण्याकरिता साहेबांना पैसे द्यावे लागेल असे सांगून तक्रारदार यांच्याकडे 4.5 हजारांची मागणी केली होती. तक्रारदार याने एसीबी नवी मुंबई कार्यालय येथे तक्रार दाखल केली होती.
शासकिय पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असलेल्या रेशन कार्डवर कमी उत्पन्नाची नोंद करणेकरीता 4.5 हजारांची रकमेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचून आनंद श्यामराव गुरव यांला तहसिल कार्यालय, पनवेल कार्यालयाचे समोरील रोडवर तक्रारदार यांचेकडुन 4.5 हजारांची लाच स्वीकारली असता त्यांना सापळा पथकाने लाचेच्या रक्कमेस रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे ,महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे यांच्या पथकाने कारवाई करत खाजगी व्यक्तीला अटक केली आहे.