Panvel Crime News : घरफोडी करणार्या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
पनवेल:- पनवेल तालुक्यातील एन.के.गार्डन वावंजे येथे बंद घरात घरफोडी करणार्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे व त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उत्तम कुरकुटे हे एन.के.गार्डन वावंजे, ता.पनवेल येथे राहतात. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून आरोपी शाकिर मोहम्मद शब्बीर खान (24) याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत जावून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो.हवा.महेश धुमाळ, सतीश तांडेल, विजय देवरे, सुनील कुदळे, पो.शि.राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भिमराव खताळ आदींच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला असताना पोलीस हवालदार सतीश तांडेल यांना खास खबर्याकडून सदर आरोपीची माहिती मिळाली व तो पुणे येथे लपल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पुणे येथे जावून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.