Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाला तक्रार
•Nitin Gadkari नागपूरच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
नागपूर :- भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या संबंधी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचारादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर केला असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी दुपारी बारा ते एक वाजे दरम्यान वैशाली नगर भागात काढलेल्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केले असल्याचा आरोप केला आहे. हे कायद्याचे उल्लंघन असून बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे देखील उल्लंघन आहे. तसेच हे आदर्श आचारसंहितेचे देखील उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी बॅनर न लावण्याचा केला होता उल्लेख
मी विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. विकासाची कामे केले असतील तर नागरिकांनी मला मतदान करावे. अशा शब्दात नितीन गडकरी यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. आपण कोणालाही चहा पाणी करणार नाही तसेच बॅनर लावणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. मात्र, आता प्रचारासाठी नितीन गडकरी यांना गल्लीबोळात फिरावे लागत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे .