Bhayandar Murder News : भाईंदरमध्ये सराफाची हत्या! एस.व्ही. रोडवरील कारखान्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

•डोक्यावर जखमा, हत्येचा संशय; कौटुंबिक वादातून झाला घात? नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाईंदर :- भाईंदर पूर्व येथील एस.व्ही. रोड परिसरात एका सराफ व्यावसायिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह त्यांच्याच सोन्यावर काम करण्याच्या कारखान्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुशांतो अबोनी पॉल (52 वय) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांतो पॉल यांचा भाईंदर पूर्व येथील एस.व्ही. रोड परिसरात सोन्यावर काम करण्याचा कारखाना आहे. त्यांचा काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याने ते मागील काही दिवसांपासून कारखान्यातच राहत होते. बुधवारी सकाळी त्यांनी कारखाना उघडला नाही, म्हणून कामगार आणि परिचित व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय वाढला.
परिणामी, कारखान्याची काच फोडून आत प्रवेश केला असता, पॉल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्यावर जखमा असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ नवघर पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असून, कौटुंबिक वाद किंवा व्यावसायिक वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.


