Prabhadevi Bridge Update : गणेशोत्सवानंतर प्रभादेवी पूल पाडणार; मात्र रहिवाशांचा तीव्र विरोध, ‘पुन्हा रस्त्यावर उतरणार’

• ‘अटल सेतू’ला जोडणाऱ्या उन्नत रस्त्यासाठी 125 वर्षांचा जुना पूल तोडण्याचा निर्णय
मुंबई :- अटल सेतूला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पातील मोठा अडथळा आता दूर होण्याची शक्यता आहे, मात्र यामुळे प्रभादेवीतील रहिवाशांमध्ये असंतोष वाढला आहे. प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेल्या 125 वर्षांच्या जुन्या प्रभादेवी पुलाचे पाडकाम करण्यासाठी एमएमआरडीएने आता गणेशोत्सवानंतरचा मुहूर्त निवडला आहे. 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडकाम सुरू होणार असले तरी, स्थानिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला असून, पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
वादाचे मूळ
दक्षिण मुंबईतून अटल सेतूपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी हा उन्नत रस्ता प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पातील प्रभादेवी येथील दुहेरी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. सुरुवातीला पुलासाठी 19 इमारती पाडाव्या लागणार होत्या, पण रहिवाशांच्या विरोधामुळे आराखड्यात बदल करून केवळ दोन इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही, या दोन इमारतींतील रहिवाशांनी ‘तिथेच पुनर्वसन’ किंवा ’19 इमारतींचा समूह पुनर्विकास’ केल्याशिवाय पूल पाडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याआधी एप्रिलमध्येही रहिवाशांनी रस्त्यावर उतरून पुलाचे पाडकाम थांबवले होते.
10 सप्टेंबरचा ‘मुहूर्त’
पुलाचे पाडकाम आणि नवीन दुहेरी पुलाचे काम रखडल्यामुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एमएमआरडीएने आता थेट वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएच्या मागणीनुसार, 10 सप्टेंबर रोजी रात्रीपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, गणेशोत्सवानंतर लगेचच पुलाच्या पाडकामाला सुरुवात होईल.
रहिवाशांचा तीव्र विरोध
या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. ‘पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावता पूल कसा काय पाडता येईल?’ असा सवाल करत बाधित हाजी नुरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ पटेल यांनी ‘कोणत्याही परिस्थितीत पूल बंद होऊ देणार नाही,’ असा इशारा दिला आहे. रहिवाशांसोबत मनसे आणि ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्तेही रस्त्यावर उतरतील, असे मनसे वाहतूक सेनेने जाहीर केले आहे.


