Navi Mumbai News : खारघरमध्ये गणेशोत्सव वर्गणीवरून वाद; ‘मराठी येत नाही’ म्हणणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला माफी मागायला लावली

•गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी मागितल्यावर दुकानदाराकडून मुजोरी; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेची इंट्री!
नवी मुंबई :- गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबईतील खारघरमध्ये वर्गणीवरून मोठा वाद झाला आहे. एका परप्रांतीय दुकानदाराने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वर्गणी देण्यास नकार देताना, ‘मराठी माणसांमुळे माझं दुकान चालत नाही’, ‘मला मराठी येत नाही आणि शिकायचीही नाही’ अशी मुजोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मनसेने यात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर संबंधित दुकानदाराने माफी मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील एक गणेश मंडळ वर्गणी गोळा करत असताना एका दुकानदाराने वाद घातला. त्याने मराठी भाषेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नंतर स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन या कृत्याचा निषेध केला. वातावरण अधिक चिघळण्यापूर्वीच दुकानदाराने माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही खारघरमध्ये अशाच प्रकारे एका पिठाच्या गिरणी चालकाने दुकानाच्या पाटीवर मराठी लिहिण्यास नकार दिला होता. ‘मराठी बोलना जरुरी है क्या सबको?’ असे विधान करत त्याने स्थानिकांना डिवचले होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नवी मुंबईसारख्या बहुभाषिक शहरात मराठी आणि अमराठी लोकांमध्ये तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. सण-उत्सवांच्या काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


