Navi Mumbai Cyber Fraud : “गुंतवणुकीचे स्वप्न… आणि 4.71 कोटींचा सायबर धक्का!

• IPO आणि ट्रेडिंगच्या नावाखाली महाघोटाळा; तरुण गुन्हेगारांचा मास्टर प्लॅन उघड
नवी मुंबई | “थोडक्यात गुंतवा, मोठं कमवा” अशा शब्दांत आमिष दाखवत दोन तरुणांनी नवी मुंबईतील व्यावसायिकाची तब्बल 4 कोटी 71 लाख रुपयांची लूट केली! IPO आणि Index Trading मधून भरघोस नफा मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत या दोघांनी फसवणुकीचा नेटके प्लॅन रचला होता. मात्र, नवी मुंबई सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या सायबर ठगांना अखेर जेरबंद केले आहे.
30 नोव्हेंबर 2024 ते 5 मार्च 2025 या कालावधीत संबंधित गुन्हा घडला. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करत गुंतवणुकीसाठी अनेक बँक खात्यांत 4.71 कोटींची रक्कम जमा करून घेतली. सायबर पोलिसांनी कलम 319(2), 318(4), 3(5) सह IT Act 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सायबर पोलिसांची चतुर कारवाई; दोन आरोपी गजाआड, आणखी अनेक संशयित रडारवर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी विकास प्रकाश गव्हाणे (27, करंजाडे) व मनोज विष्णु कालापाड (22, मालेगाव, वाशिम) यांना 7 जून 2025 रोजी अटक केली. दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, तपासादरम्यान त्यांचा 10 इतर सायबर गुन्ह्यांमधील सहभागही उघड झाला आहे.
सायबर पोलिसांकडून आता इतर आरोपींचा शोध सुरू असून, या सायबर रॅकेटचा फास आणखी मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा सायबर गुन्हा मिलींद भारंबे पोलीस आयुक्त, संजय येनपुरे सह पोलीस आयुक्त, दीपक साकोरे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि भाऊसाहेब ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त, आ.गु.शा./सायबर यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस हवालदार विजय आयरे, संदेश गुजर, पोलीस शिपाई भाऊसाहेब फटांगरे, पोलीस शिपाई नितेश म्हात्रे, महिला पोलीस शिपाई पुनम गडगे (नवी मुंबई) यांनी उघडकीस आणला आहे.



