Nishikant Dubey : मराठी भाषिकांविरोधातील वक्तव्यावरून भाजप खासदाराला मनसेची कायदेशीर नोटीस

•निशिकांत दुबे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर मनसेचा आक्रमक पवित्रा; लेखी माफी न घेतल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा
नाशिक :- भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप नोंदवत मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दुबे यांनी केलेली विधाने ही फूट पाडणारी, द्वेषमूलक आणि एका विशिष्ट भाषिक समुदायाच्या बदनामीस प्रवृत्त करणारी असल्याचा ठपका मनसेचे पुणे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ठेवला आहे.
या नोटीसीत दुबे यांच्याकडून सात दिवसांच्या आत जाहीर किंवा लेखी माफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह विधाने त्वरित हटवावी, व भविष्यात भाषिक, प्रादेशिक वा सांस्कृतिक भावना दुखावणारी विधाने न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ॲड. मनोज पिंगळे यांच्या माध्यमातून दिला आहे.
हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने अलीकडेच आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर दुबे यांनी ठाकरे बंधूंवर जहरी टीका करताना मराठी भाषिकांबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप कोंबडे यांनी केला आहे.
या विधानांमुळे प्रादेशिक द्वेष वाढण्याचा, आणि सार्वजनिक शांतता व सामाजिक सौहार्द धोक्यात येण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करून, त्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलले जात असल्याचे मनसेने स्पष्ट केले.



