Naraka Chaturdashi : ‘नरक चतुर्दशी’
नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.
आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त
चतुर्दशी तिथी बुधवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:04 वाजता सुरू होईल आणि 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:11 वाजता समाप्त होईल. मेष राशीत 30 ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळीची पूजेची वेळ दुपारी 04:36 ते 06:15 पर्यंत असेल.
नरक चतुर्दशीचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते. या दिवशी सकाळी स्नान करून श्रीकृष्णाची पूजा केल्याने सौंदर्य प्राप्त होते असे मानले जाते.